मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उद्योजकांना सोयीसुविधा देताना राज्याचा समतोल बिघडू न देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा, त्या प्रगतीला पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘ दैनिक लोकसत्तानं आयोजित केलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं उदघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.उद्योजक होणं म्हणजे स्वत: एकट्याची सुबत्ता मिळवणं नाही. तर इतरांनाही सोबत घेऊन त्यांच्या आयुष्यात सुबत्ता देणारे आपण आहोत असं सांगणारा वर्ग आहे, असं ते म्हणाले.
मधल्या काळात अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न आपण सुरु केला आहे. आपल्याला टप्प्याटप्प्यानं सगळेच सुरु करायचं आहे. आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे. पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीनं वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे, असं ते म्हणाले.सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही, तर देशातच नव्हे, संपूर्ण जगात अस्वस्थता माजेल. हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खुप गरज. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचं आहे, असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं.
उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे.पर्यटनातून रोजगार वाढतो म्हणून आपण या क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभला, पुरातन मंदिरे महाराष्ट्रात आहेत, गडकिल्ले आहेत, जंगले आहेत. पण आपण अजूनपर्यंत पर्यटनाकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही.या क्षेत्राकडे गांभीर्यानं बघितलेलच नाही.
काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्रं उदयाला येत आहेत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. विकासाबरोबर पर्यावरणाकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरी खुप मोठी गोष्ट आहे. राज्याचा एक मॅप करू जो राज्यात कोणत्या भागात कोणत्या उद्योगांची सुरुवात करता येईल हे सांगेल आणि एकदा हे निश्चित झालं तर त्याला लागणाऱ्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू, असं ते म्हणाले.
त्या त्या भागात सुरु होणाऱ्या उद्योगांची लोकांना माहिती देऊ. माहिती अभावी उद्योगांना विरोध होतो. ते टाळण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन प्रादेशिक उद्योग उभारायचे, स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन तिथंच काम उपलब्ध करून द्यायचं याकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. कोविडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठं संकट निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. उद्योग मित्रासारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे उद्योग मित्र राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे.
राज्यात गुंतवणूकीसाठी “आपलेपणा”ची भावना निर्माण करण्याचे काम शासन करत आहे.राज्यात उद्योजकांना जे सहकार्य आवश्यक आहे ते दिलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे, सीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही नरेंद्रन, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, यांच्यासह उद्योग क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.