नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२ किलोमीटरच्या परिसरात २०० फूट अंतरापर्यंत आणि ग्रीन झोन मध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. नवीन नियमानुसार, जास्त वजन वाहून नेणारे ड्रोन आणि ड्रोन टॅक्सी साठी ड्रोनची वहनक्षमता ३०० वरून ५०० किलोग्रॅम इतकी वाढवण्यात आली आहे. या क्षेत्रात आधी आवश्यक असलेल्या परवानग्यांची संख्या देखील २५ वरून ५ इतकी कमी केली आहे. ड्रोन वापरासाठी नोंदणी पूर्वी कोणत्याही संरक्षणविषयक परवानग्यांची आवश्यकता नसेल. तर या क्षेत्रातल्या अनियमिततांबद्दल जास्तीतजास्त १ लाख रुपयांचा दंड निश्चित केला आहे. कार्गो डिलिव्हरीसाठी स्वतंत्र ड्रोन कॉरीडॉर विकसित केला जाणार असून उद्योगांना अनुकूल वातावरणासाठी मानवरहित विमान प्रणाली संवर्धन परिषद स्थापन केली जाणार आहे. ड्रोनविषयक नवीन धोरणांमुळे देशात स्टार्ट अप्स ना चालना मिळेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.