नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा आंतरराष्ट्रिय टर्मिनलच्या उद्घघाटन प्रसंगी बोलत होते. प्रधानमंत्री गती शक्ती योजना ही पायाभूत सुविधा विकासाला चालना देत आहे, असं ते म्हणाले.
कर्नाटकला पहिली मेड इन इंडिया वंदे भारत आणि काशी दर्शन या दोन रेल्वे गाड्या मिळाल्या असून इथल्या लोकांची अनेक दिवसांची असलेली दुसऱ्या टर्मिनलची मागणीही आमच्या सरकारनं पूर्ण केली असून आज या दूसऱ्या टर्मिनलचं उद्धघाटन झालं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी बेंगळूरू मध्ये विधान सौध इथं ते संत कवी कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली. तसंच वंदे भारत एक्स्प्रेस आणि भारत गौरव एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना, त्यांनी के एस आर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला.
केम्पेगौडा विमानतळावर उभारण्यात आलेल्या नादप्रभू केम्पेनगौडा यांच्या एकशे आठ फुट उंच कास्य पुतळयाचं अनावरणही त्यांच्या हस्ते झालं. यानंतर प्रधानमंत्री तमिळनाडूतील दिंडीगूल इथं गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. उद्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि कोनशिला समारंभ पार पडेल. तेलंगणातील रामगुंडम इथल्या आर एफ सी एल च्या कारखान्याला ते भेट देणार असून, इथं देखील त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि कोनशिला समारंभ होणार आहे.