नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलजीवन मिशन योजनेमुळं ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून देशाच्या ग्रामीण भागात घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्याचं ७० टक्के काम पूर्ण झालं असल्याची माहिती केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात पाईट गावासह इतर दोन गावांतील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ राज्य मंत्री पटेल यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून प्रत्येक राज्यानं पुढे येऊन जल जीवन अभियानाच्या कामांना अधिक गती देण्याचं आवाहनही पटेल यांनी केलं.
जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन पाईट या गावात करण्यात आले. याप्रसंगी ३५ गावांना जलजीवन मिशनचे ‘मंजुरी पत्र’ देण्यात आलं. शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचं पटेल म्हणाले.
कांद्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने नाशिक बरोबरच मध्य प्रदेशातील देवास इथे संशोधन चालू आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतीत देखील समूह शेतीचे प्रयोग व्हायला हवेत. प्रक्रिया उद्योगासाठी सहकारी तत्वावर संस्था स्थापन करून पुढे येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.