नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसाममधले अहोम सेनापती लचित बारफुकन यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचा सांगता समारंभ दिल्लीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. चुकीच्या पद्धतीनं लिहिलेला इतिहास पुन्हा नव्यानं लिहायची गरज त्यांनी अधोरेखित केली. ब्रिटिश काळानंतर झालेल्या चुका आता सुधारल्या जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
लचित बारफुकन यांनी आपल्याला देशभक्तीची शिकवण दिल्याचं ते म्हणाले. तलवारीच्या जोरावर भारताचा शाश्वत वारसा मिटवू पाहणाऱ्यांना कडक उत्तर देणं भारताला चांगलंच जमतं , असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
लचित बारफुकन हे मूर्तिमंत शौर्याचं प्रतीक आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ईशान्य भारताच्या विकासासाठी प्रधानमंत्री मोदी सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.