नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. नीती आयोग आणि अणुउर्जा विभागाच्या वतीनं आयोजित या विषयावरील कार्यशाळेत ते काल बोलत होते.
देशात नवीकरणीय उर्जेला चालना देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत असून, देशातल्या या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी खाजगी क्षेत्र आणि स्टार्टअप्सचा शोध घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अक्षय ऊर्जा क्षेत्रात चीन, युरोप आणि संयुक्त राष्ट्रांच्या नंतर भारत चौथ्या क्रमांकावर असून हे उपाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत आहे.