नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज समलैंगिक संबंधांवरच्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान हे संकेत दिले होते. समलैंगिक संबंधावरच्या याचिकेवर उद्या दुपारी १२ वाजेनंतर सुनावणी होऊ शकते. कारण त्यापूर्वी आम्हाला घटनापीठाकडे प्रलंबित असलेल्या दोन याचिकांवर निकाल द्यायचा आहे, असं सरन्यायाधीश आज सुनावणी दरम्यान म्हणाले.

राज्यातल्या सत्तासंघर्षावरची शेवटची सुनावणी १६ मार्चला झाली होती आणि त्यादिवशी घटनापीठानं निकाल राखून ठेवला होता. तसंच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातल्या अधिकार कक्षेच्या संदर्भात १८ जानेवारीला न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर झाली. न्यायमूर्ती शाह येत्या सोमवारी सेवानिवृत्त होणार असल्यानं त्यापूर्वी या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.