मुंबई (वृत्तसंस्था) : पर्यावरण पूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं. ठाणे महानगरालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेला विकासकामं हवी आहेत, त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही, त्यामुळे आम्ही कमी बोलून विकास कामांना गती देण्याचं आणि त्यातील अडथळे दूर करण्याचं काम हाती घेतलं आहे, देवेंद्र फडणवीस आणि आपण मिळून हे काम करीत आहोत, त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने पूर्ण सहकार्य केलं आहे म्हणूनच राज्याच्या विकासाची गती वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेश भागातील रखडलेले विविध प्रकल्प सिडको, म्हाडा, एम एम आर डी सी आदी सक्षम सरकारी यंत्रणांमार्फत राबविले जात असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यावेळी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रस्ता इथले आदिवासी वसतिगृह, पोखरण रोड इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तसंच विपश्यना केंद्र, कासारवडवली इथं सिंधुताई सकपाळ तिरंदाजी केंद्र, ठाण्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती केंद्र आणि डिजिटल अक्वेरीयम या विकास कामांची पायाभरणी मुख्यमंत्र्यानी केलं.