नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि त्यांना मणिपूर मधल्या सद्य परिस्थतीची माहिती दिली. गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली राज्य आणि केंद्र सरकार गेल्या आठवड्यात हिंसाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलं असल्याचं सिंग यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या भागात १३ जून नंतर हिंसक आंदोलनामुळं एकही मृत्यू झालेला नाही, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर मध्ये परिस्थती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल असं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी मणिपूर सरकारला दिले आहेत.