मुंबई (वृत्तसंस्था) : अनुवांशिक रक्तदोषामुळे होणाऱ्या हेमोफिलिया या आजारावर उपचारांसाठी राज्यातल्या सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘डे केअर’ केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. भाजपाच्या उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
सध्या राज्यातील ९ जिल्ह्यातच अशी सुविधा उपलब्ध आहे. या केंद्रात डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी आणि समुपदेशनासाठी चमू उपलब्ध करून देण्यात येईल तसंच राज्यभरात या आजारासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेण्यात येईल, असंही सावंत यांनी सांगितलं. या आजारावरच्या औषधोपचारांसाठी केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी २७ कोटींचा तर या वर्षासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली.