नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिह्यात शिर्डी इथ दुपारी त्यांचं आगमन होईल. त्यानंतर ते श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देतील. आणि मंदिरात नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन करतील. या संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दहा हजारांहून अधिक भाविकांसाठी प्रतीक्षालय, सामान कक्ष, स्वच्छतागृह, आरक्षण तसंच प्रसाद आणि माहिती केंद्र अशा सर्व वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. या नवीन दर्शन रांग संकुलाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये केली होती.
निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याखेरीज प्रधानमंत्री ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा शुभारंभ करतील. महाराष्ट्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिल्याने तया योजनेचा लाभ होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी गोव्यासाठी रवाना होतील.
गोव्यात मडगावच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर इथं ३७ व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांचं औपचारिक उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल.