नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी खासदारांकडून मिळालेल्या पासेसचा वापर करुन दोन तरुणांनी संसदेत प्रवेश मिळवला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सरकारच्या निवेदनाची मागणी खासदारांनी करणं साहजिक आहे. यावर कोणतंही निवेदन न देता, उलट अशी मागणी करणाऱ्या खासदारांवर कारवाई करुन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटलं आहे. संसदेचं सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीनं या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती पवार यांनी राज्यसभा अध्यक्षांना या पत्रातून केली आहे.