नवी दिल्ली : भारतात तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी सीमा शुल्क विभागाने आपल्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल केले आहेत. नव्या बदलांमुळे विदेशी तस्करांना पलायन करणे कठीण होईल. अलीकडे विदेशी नागरिकांकडून भारतात बेकायदेशीररीत्या सोने आणि विदेशी चलन आणण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांचे भारतात कोणत्याही प्रकारचे हितसंबंध अथवा मालमत्ता नसते. त्यामुळे ते एकदा जामिनावर सुटले की, पळून जातात. नंतर खटल्यासाठी ते उपलब्धच होत नाहीत. त्यांना न्यायालयांकडून कारणे दाखवा नोटीस बजावणेही अवघड होऊन जाते. त्यातून खटल्यांना उशीर होतो. कधी कधी खटला उभा राहणेच अशक्य होऊन बसते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या समस्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांत आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमांनुसार लवकरात लवकर खटल्यास सुरुवात करण्यात येईल. गरज भासल्यास कारणे दाखवा
येईल.
माहीतगार अधिकाऱ्याने सांगितले की, साधारणत: कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष खटल्याचे कामकाज सुरू होते. तथापि, सोने, विदेशी चलन, बनावट नोटा, शस्त्रे, स्फोटके, पुरातन वस्तू, कलात्मक वस्तू, प्राण्यांचे अवयव, विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती यांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणांत सीमा शुल्क कायद्यान्वये कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर लगेच खटला सुरू केला जाईल. नव्या बदलांमुळे विदेशी तस्कर जामिनावर मुक्त होऊन फरार होण्याचे प्रमाण घटेल.
दिल्ली विमानतळावरून तस्करी होण्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०१८ मध्ये सोन्याच्या तस्करीच्या ३४० घटना समोर आल्या. आदल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या तस्करीतील वाढ तब्बल ५८ टक्के आहे. तस्करीचे ४०२.४८ किलो सोने पकडले गेले आहे. त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे. यात २६२ जणांना अटक झाली आहे.
२०१८ मध्ये विदेशी चलनाच्या तस्करीच्या ५७ घटना समोर आल्या. त्यात २२.२७ कोटी रुपयांचे विदेशी चलन पकडण्यात आले. तसेच ३८ लोकांना अटक करण्यात आली.