तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे नवी दिल्ली ते लखनऊ अशी धावू लागताच, रेल्वेचे खासगीकरण होणार, अशी चर्चा रंगू लागली. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च आला आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतात व बंद होतात. ही एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली होती. अलीकडेच काही तांत्रिक कारणास्तव नवी दिल्लीकडे जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला तीन तास उशीर झाला. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना २५० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तेजस एक्स्प्रेसला एक तासाहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना १०० रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास २५० रुपये भरपाई मिळेल, असा नियम आहे. त्यानुसार ही भरपाई देण्यात आली. त्यामुळे एखादी एक्स्प्रेस गाडीला उशीर झाल्यामुळे देशात पहिल्यांदाच प्रवाशांना नुकसानभरपाई मिळाली.

वस्तुत: वक्तशीरपणा आणि रेल्वेचा तसा दुरान्वयेही संबंध नाही. एकूणच ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे जणू प्रत्येक सरकारी कार्यालयांचेच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवेचे एकवेळ ठीक आहे. ती थोडीफार विलंबाने धावते. अपवाद फक्त रविवारच्या मेगा ब्लॉकचा. या दिवशी घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला किती वाजताची लोकल मिळेल आणि आपण ठरलेल्या ठिकाणी किती वाजता पोहोचू हे सांगता येत नाही. पण आता रेल्वेने वक्तशीरपणावर भर द्यायला सुरुवात केली आहे. म्हणूनच मेल आणि एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन यांचा वक्तशीरपणा आता वाढत असल्याचे दिसत आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये रेल्वेचा वक्तशीरपणा वाढला आहे. ६७.०५ टक्क्यांवर असलेला वक्तशीरपणा ७४.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, एप्रिल आणि मे या सुट्टीच्या कालावधीत जादा विशेष गाड़या सोडल्या जातात. परिणामी रेल्वेमार्गावरील वाहतुकीचा ताण वाढलेला असतो. पण? अशा परिस्थितीतही बहुतांश मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन वेळेवर धावल्या. सन २०१८-१९ मध्ये या दोन महिन्यांत मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा हा अनुक्रमे ६०.५२ टक्के आणि ५९.९५ टक्के होता, तर २०१९-२० च्या एप्रिलमध्ये ७२.१३ टक्के आणि मे महिन्यात ६८.७८ टक्के मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा पाहायला मिळाला. असेच चित्र पॅसेंजर ट्रेनच्या बाबतीतही पाहायला मिळाले. २०१८-१९ च्या एप्रिल आणि मे महिन्यांत पॅसेंजर ट्रेन अनुक्रमे ६५.२१ टक्के आणि ६४.८६ टक्के वक्तशीर होत्या, तर २०१९-२० मधील याच दोन महिन्यांत त्या अनुक्रमे ६८.८७ टक्के आणि ६७.३३ टक्के वेळेवर धावत होत्या. सर्व गाड़या वेळेपत्रकानुसार धावाव्यात, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही खास उपाययोजना केल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे देखभाल आणि दुरुस्ती.

एकदा मेगाब्लॉक घेतल्यानंतर संबंधित सर्व विभाग एकाच वेळी आपापली कामे पूर्ण करतील. मार्गामध्येच डिझेल इंजिन बदलून विजेवर चालणारे इंजिन जोडायचे किंवा विजेवर चालणारे इंजिन बदलून डिझेल इंजिन जोडायचे, असे काही गाड़यांच्या बाबतीत केले जात असे, पण? आता गाडी सुटल्यापासून निर्धारित स्थळी जाईपर्यंत डिझेल इंजिनचाच वापर करण्यात येतो. तसेच मधल्या प्रमुख थांब्यावरील गाडी थांबण्याची वेळही कमी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने केलेले हे बदल प्रशंसनीय आहेत. पण? त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावर देखील असाच काटेकोरपणा अपेक्षित आहे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर, रेल्वे फलटांवर असलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरील स्वच्छता. याकडे ‘प्रामाणिक’पणे लक्ष देण्याची गरज आहे. या स्टॉलवर मिळणाऱ्या सरबतांसाठी वापरण्यात येणारे पाणी, ते तयार करण्याची पद्धत आणि ते ज्या ग्लासातून दिले जाते, त्याची स्वच्छता याची तपासणी करणेही महत्त्वाचे आहे.