मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?

आंतरराष्ट्रीय नियमांबरोबरच वारंवार शस्त्रसंधी आणि युद्धनियमांचे उल्लंघन करीत, दहशतवादाला खतपाणी घालत भारताच्या सीमेवर सातत्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चांगलाच धडा दिला आहे. सजिर्कल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे शेपूट थोडे तरी सरळ होईल, अशी अपेक्षा असताना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांना प्रोत्साहन देणे कायम ठेवत पाकिस्तानने कुत्र्याची शेपूट कधीच सरळ होणार नाही, हे दाखवून दिले आहे. अशा हल्ल्यांनाही भारतीय लष्कराने चोख आणि खरमरीत उत्तर देत पाकिस्तानची प्रत्येक आगळीक परतवून लावली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या भारताला जवळपास जगभरातील सर्वच देशांनी पाठिंबा दिला आहे. यात अर्थातच पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे.

कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात भारताला मोठा विजय मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच या शिक्षेवर पुनविर्चार करण्याचा आदेशदेखील दिला आहे. नेदरलॅण्डच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताने उपस्थित केलेले सर्वच मुद्दे ग्राह्य धरण्यात आले. आयसीजे अर्थात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणी पाकिस्तानला फटकारताना कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची समीक्षा करावी, असे सांगत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली. या निर्णयामुळे भारतीय उच्चायुक्तातील अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेऊ शकतात, तसेच त्यांना वकील आणि इतर कायदेशीर सुविधा पुरवू शकतात. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात नाममात्र एक रुपया मानधन घेऊन या खटल्यात जाधव व भारताची बाजू मांडली. दुसरीकडे पाकिस्तानने वकिलावर २० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. कुलभूषण जाधव यांना घुसखोर ठरवण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या वकिलासाठी चक्क २० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. मागील वर्षी पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडताना आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटल्याच्या खर्चासंदर्भात उल्लेख केला होता. व्हिएन्ना करारातील कलम ३६ नुसार, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील भारतीय दूतावासाचा राजनैतिक अधिकार पाकिस्तानने देणे बंधनकारक असल्याची मागणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेली होती. जी मान्य करण्यात आली आहे.

त्यामुळे आता हा खटला पाकिस्तानात पुन्हा नव्याने सुरू होईल. तिथे कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत मिळेल. या मदतीमुळे भारत पाकिस्तानच्या कोर्टात आपली बाजू मांडेल. कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदल अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’ साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करीत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.