गुरुवार २२ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले अँमेझॉनच्या जंगलात प्रचंड वणवा पेटला. या सर्वत्र पसरलेल्या वणव्यात अँमेझॉन जंगलात असलेले प्रचंड जुने लाखो वृक्ष जळून खाक होत गेले. त्याचप्रमाणे अनेक वन्य प्राणीही मृत्युमुखी पडले आहेत. या वणव्याचे स्वरूपच एवढे भयानक होते की, या आगीचा प्रचंड काळा धूर ३२०० किलोमीटरच्या परिसरात पसरला. ब्राझीलमधील सर्वात मोठे शहर म्हणजे साओ पावलो. हे शहर या अँमेझॉन जंगलापासून कित्येक किलोमीटर लांब आहे; परंतु या शहराचे अवकाशसुद्धा भर दुपारी काळ्या ढगांनी आच्छादून गेले होते.

ब्राझीलचा हा अँमेझॉन वणवा म्हणजे जागतिक समस्या होत चालली आहे, असे जागतिक पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. आज जागतिकीकरणाच्या काळात एखाद्या देशातील मोठी नैसगिर्क आपत्ती सुद्धा जागतिक होत चालली आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच या वणव्याबद्दल जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. ब्राझीलचे हे अवाढव्य जंगल ब्राझीलसह जवळपासच्या नऊ देशांमध्ये विभागले आहे. त्यामुळे पर्यावरणासंबंधीचे कायदे प्रत्येक देशाचे वेगळे आहेत. अँमेझॉन जंगल ६०% ब्राझीलमध्येच पसरलेले आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची आणि वणव्याच्या संकटातून मार्ग काढण्याची सर्वस्वी जबाबदारी ब्राझील सरकारचीच येते. या संदर्भात फिनलंड व आर्यलड या देशांच्या सरकारने इशारा दिला की, ‘‘ब्राझील सरकारने योग्य ती उपाययोजना करून वणव्याची आग आटोक्यात आणली नाही, तर आम्ही ब्राझीलशी व्यापारसंबंध तोडून टाकू. ‘ब्राझील आणि आसपासच्या नऊ देशांमध्ये या अवाढव्य वणव्याच्या काळ्या धुराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे या जागतिक संकटातून मार्ग काढण्याची सर्वाधिक जबाबदारी ब्राझील सरकारवरच येते. सध्या ब्राझीलमध्ये अति उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो सत्तेवर आहेत. पर्यावरण वगैरेसारख्या विषयात त्यांना रस नाही. राष्ट्रवादाचा अंगार पेटवून ते सत्तेत आले. सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रवादाच्या मुद्यालाच चिकटून बसले होते. परंतु नंतर मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझील सरकारवर दबाव वाढत गेला. संयुक्त राष्ट्रसंघ व युरोपियन युनियनने प्रामुख्याने यामध्ये लक्ष घातले. तेव्हा कुठे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी वणवा विझवण्याची जबाबदारी घेऊन लष्कर पाठविण्याचे मान्य केले. परंतु, अँमेझॉनचे अवाढव्य जंगल तेथील वणवा आणि जागतिक हवामान बदल यांच्या परस्पर संबंधांविषयी त्यांना काही देणे-घेणे नाही.

दक्षिण अमेरिकेमध्ये वसलेल्या ब्राझील या देशाने दक्षिण अमेरिकेचा बराचसा भाग व्यापून टाकला आहे. अँटलांटिक महासागराचा प्रचंड किनारा ब्राझीलला लाभला आहे. ब्राझीलमध्ये पर्यटकांची गर्दी बारा महिने असते. प्रामुख्याने ब्राझीलमधील अवाढव्य पसरलेले वर्षावन बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. अँमेझॉन वर्षावन अत्यंत घनदाट असून विस्तीर्ण पसरलेले आहे. ६०% भाग ब्राझीलमध्ये येतो, पेरुमध्ये १३%, कोलंबियामध्ये १०% येतो, तर इतर शेजारी देशांमध्ये प्रमाण कमी आहे. हे वर्षावन बाराही महिने हिरवेगार असते, सहसा कोरडे पडत नाही. बारा महिने येथे पाऊस पडत असतो, म्हणूनच अँमेझॉन जंगल हिरवेगार दिसते आणि त्यामुळेच याला ‘वर्षावन’ असे म्हटले जाते. बाराही महिने तेथे पाऊस पडत असला तरी पावसाळ्याच्या ‘सीझन’मध्ये वर्षावनात जो थरारक पाऊस पडतो तो बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. आज या अवाढव्य अँमेझॉन जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे जागतिक समस्या कशी निर्माण झाली आहे? दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे हे प्रचंड जंगल जागतिक तापमानवाढीचे नियंत्रण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे कार्य करत असते. याचा अर्थ असा आहे की, या जंगलामुळे जगाला प्राणवायूचा पुरवठा होत असतो आणि नेमक्या याच कारणासाठी आज अँमेझॉन वणव्याची चर्चा जागतिक पातळीवर होत आहे.