पुणे : जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेल, यासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान ( जे.एस.ए .) राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिरूर आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने या अभियानाची सद्यस्थिती व सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, कृषी, महसूल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना, चेक डॅम, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन, पारंपरिक पाणीयोजना, तळी आदी संरचनांचे नूतनीकरण तसेच विहीरी आणि विंधनविहीरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाआदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यातील कामांचा आढावा घेताना नियोजन करून कामे गतीने पूर्ण करा, असे सांगतानाच काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू झाल्यानंतर व काम पूर्ण झाल्यानंतरच्या सर्व प्रक्रिया नियोजनपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

पीकपदधती, ठिबकचा वापर, योजना, व स्थानिक पातळीवरील सहभाग वाढविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहायक, भूजल यंत्रणेसह गावचे सरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेल, यासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.