वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत.
अमेरिकी वित्त मंत्रालयाने विदेशी व्यापारी भागीदारांची चलनविषयक धोरणे आणि स्थूल आर्थिक घटक याविषयी काँग्रेसला पाठविलेल्या अर्धवार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. भारताने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे ही कारवाई केली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या धोरणात्मक बदलांमुळे चलनविषयक चिंता दूर झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारताप्रमाणेच चलन निगराणी यादीतून बाहेर काढण्यात आलेला स्वीत्झर्लंड हा दुसरा देश ठरला आहे. अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने म्हटले की, या अहवालात भारताला निगराणी यादीतून बाहेर काढण्यात येत आहे. सलग दोन अहवालांत भारताने यासंबंधीचा एक निकष पूर्ण केला आहे.
मे २०१८ मध्ये अमेरिकेने भारताला पहिल्यांदा या यादीत समाविष्ट केले होते. अहवालात म्हटले आहे की, भारताने उल्लेखनीय सुधारणा केल्या आहेत. २०१८ च्या पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँकेने विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात शुद्ध विक्री केली. त्यामुळे जून २०१८ पर्यंतच्या चार तिमाहींतील विदेशी चलनांची शुद्ध खरेदी कमी होऊन ४ अब्ज डॉलरवर म्हणजेच सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या ०.२ टक्क्यांवर आली. (वृत्तसंस्था)