तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे त्रिभंगा. हा संपूर्णपणे स्त्रीप्रधान सिनेमा असणार आहे. शबाना आझमी, काजोल आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध असणारी मिथिला पालकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे.

शबाना आझमी,काजोल आणि मिथिला पालकर या पहिल्यांदाच सिनेमात एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाला कधी सुरवात होईल आणि हा सिनेमा कधी रिलीज होणार आहे यासंदर्भात लवकरच माहिती जाहीर होणार आहे. मात्र रेणुका शहाणे यांचं दिग्दर्शन आणि शबाना आझमी, काजोल आणि मिथिला पालकर यांची अप्रतिम अदाकारी पाहण्यासाठी रसिक नक्कीच उत्सुक असतील.

रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं होतं. हा सिनेमा रेणुकाची आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या रीटा वेलिंगकर या पुस्तकावर आधारित होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी,मोहन आगाशे आणि तुषार दळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.