नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल डब्ल्युटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. बहुउद्देशीय व्यापारातील आव्हानं आणि सुधारणांबाबत भारताची एकूण तयारी यांवर चर्चेत विशेष भर देण्यात आला.
जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक शिखर बैठकीसाठी गोयल डावोसच्या दौर्यावर आहेत. बैठकीत व्यापारातील सर्वसमावेशकता, पारदर्शीपणा आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसलेल्या सुधारणा या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याचं गोयल यांनी ट्वीटमधून स्पष्ट केलं आहे.
व्यापाराच्या दृष्टीनं उज्ज्वल भविष्यासाठी भारतात गुंतवणूक करणं उत्तम असल्याच, दावोसच्या परिषदेनं दाखवून दिल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेत असून गुंतवणूकीच्या दृष्टीनं व्यापारासाठी भारतात चांगल्या संधी असल्याचंही गोयल यांनी म्हटलं आहे.