पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये जिल्हाकृती दलामार्फ़त विविध ठिकाणी धाडस्त्राचे आयोजन करणे, बालकामगार प्रथा विरोधी फ़लक प्रदर्शित करणे, विविध व्यावसायिक, मालक वर्गाकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही अशा स्वरुपाची हमीपत्रेभरुन घेणे, बालमजूरी विरोधी शपथ घेणे स्थानिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्दी देणे इत्यादी स्वरुपाचे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

बालकामगार प्रथा या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्यातील नविन तरतुदीनुसार 14 वर्षा खालील मुलांना मजूरी करण्यास भाग पाडणे कायद्याने गुन्हा आहे. या बाबत सजगता बाळगावी तसेच 14 ते 18 वर्षा पर्यंतच्या मुलांना धोकादायक काम करण्यास भाग पाडणे, अशा गुन्‍हयांपासून सर्वानी सजग रहावे. मुलांना शाळेत पाठविणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.

आपण सर्वानी मिळून बालमजुरी या अनिष्ट प्रथेचे समुळ उच्चटन करुया, असे आवाहन पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त श्री. शैलेद्र पोळ व पुणे जिल्‍हयाचे कामगार उप आयुक्त श्री. विकास पनवेलकर यांनी केले आहे.