नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला असून, साडेचार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे.

लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन WHO अर्थात, जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम गॅब्रियस यांनी दिलं आहे.

भारतासह जगातले सर्व देश चीनच्या हुबेई प्रांतातून आपल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तिथून परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याची गरज वाटत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वूहानमधे भारताचे अडीचशेपेक्षा जास्त नागरिक आहेत. त्यात बहुतांश संशोधक विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे काम करणारे आहेत.

या आजाराचा सर्वाधिक धोका चीनच्या सर्वात जवळच्या शेजारी देशांना असल्याचं अर्थतज्ञांचं तसंच पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे. व्हिएतनाम, सिंगापूर आणि फिलीपाईन्सलाही या विषाणूचा फटका बसण्याची भिती आहे.