नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम संमेलन-२०२० मध्ये बोलत होते.

युवकांनी हिंसाचार आणि इतर विध्वंसक शक्तींना पाठबळ देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या विकासासाठी शांतता सर्वाधिक महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले. हैदराबादमधल्या सुमारे 50 शाळांमधले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. देशाचा समृद्ध  वारसा आणि परंपरा यांचं नेहमीच जतन करा, असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना केलं.

युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करावा आणि गरिबी, भेदभाव, असमानता, भ्रष्टाचार आणि भूक यांच्यापासून मुक्त अशा नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं, असं आवाहन नायडू यांनी केलं.