मुंबई : महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एनजीओ) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एनजीओ नी समन्वयाने काम करावे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

मंत्रालयात महिला व बालविकास, ग्रामीण विकास, महिलांचा कौशल्य विकास आदी क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या ‘एनजीओ’नी श्रीमती ठाकूर यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

माता व बालकांना पोषण आहार पुरवठा, महिलांना शिवणकला, हस्तकला आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण, महिला व बालकांची आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य, बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया, युवकांसाठी रोजगार निर्मिती, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदी पुनरुज्जीवन आदी उपक्रमांचे सादरीकरण सामाजिक संस्थांनी केले. यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी बारकाईने संस्थांच्या कामाची माहिती घेत संस्थांनी आपल्या सूचना आणि प्रशासनाकडून आवश्यक सहकार्याविषयी माहिती सादर करावी, असे सांगितले.

या सादरीकरणासाठी टाटा ट्रस्ट, युनायटेड नेशन्स फौंडेशन, स्नेहा, द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन, इंडियन लॉ सोसायटी, फौंडेशन फॉर इकोलॉजिकल सोसायटी, युथ फॉर जॉब्ज, जेएसडब्ल्यू प्रोग्राम, रेमंड, सत्य साई चॅरिटेबल ट्रस्ट, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशन, कोरो आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.