मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण कल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड नाविन्यता सोसायटीतर्फे करण्यात येईल व निवडलेल्या विद्यार्थ्यांना या ई-समिटमध्ये विनाशुल्क सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ई-समिट मुंबई आयआयटी येथे १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे.

स्टार्टअप सुरु करू इच्छिणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम यात होणार आहेत. तरुणांसाठी दिशादर्शक असणाऱ्या या कार्यक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. शिक्षण पूर्ण झाले की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा स्टार्टअप सुरु करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी नेमका कोणता मार्ग निवडावा याची माहिती नसते. अशाच तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा या ई-समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

समिटमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्योग जगतातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. विप्रोचे संचालक अझीम प्रेमजी, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप, ट्विटरचे भारत विभागप्रमुख मनीष महेश्वरी, लिनीवोचे सीईओ राहुल अग्रवाल हे दोन दिवसांच्या कार्यक्रमात तरूणांना मार्गदर्शन करणार आहेत. समिटमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचा आणि उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. लाईव्ह पिचिंग, स्टार्टअप एक्स्पो, आंतरवासिता व नोकरी मेळावा, नाविन्यता आणि उद्योजकता परिषद, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन कॉन्क्लेव, स्टार्टअप एक्स्पो, टेन मिनिट मिलियन चॅलेंज, सीड स्टार्स, हॅकेथॉन्स तसेच विविध कार्यशाळा आणि स्पर्धांचा समावेश आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी https://www.ecell.in/ esummit/index.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच नाविन्यपूर्ण कल्पना https://cutt.ly/ESummit-MSInnoS या संकेस्थळावर कळवा आणि समिटमध्ये विनाशुल्क सहभाग मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.