नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. युरोपीय संघातले भारताचे मित्र पाकिस्तानच्या मित्रांपेक्षा वरचढ ठरले. या संघातल्या बहुतेक देशांशी संपर्क साधून भारतानं सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात त्यांनी मतदान करू नये म्हणून पाठपुरावा केला होता.
या कायद्याबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून थेट दृष्टीकोन समजून घेईपर्यंत मतदान पुढे ढकलण्याची तयारी युरोपीय संघाच्या खासदारांनी दर्शवली. मार्चच्या मध्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जयशंकर ब्रसेल्सला भेट देणार आहेत.






