नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण, गृह, नागरी हवाई वाहतूक,आरोग्य संशोधन या विभागांचे सचिव आणि आय टी बी पी, ए एफ एम एस, तसच एन डी एम ए यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आतापर्यंत अशा सहा आढावा बैठकी घेतल्या आहेत. चीनचा प्रवास टाळावा तसच प्रवास करावा लागलाच, तर चीनमधून येणाऱ्या लोकांचा, तसंच १५ जानेवारीपासून चीनमधून भारतात आलेल्या लोकांचा, चाचण्या पूर्ण होईपर्यंत  इतरांशी संपर्क होऊ देऊ नये अशी नवी सूचना सरकारनं जारी केली आहे.

मालदीवच्या सात नागरिकांसह ३३० प्रवाशांची दुसरी तुकडी काल वुहान मधून भारतात आली असून यापैकी तीनशे जणांच्या निवासाची सोय आय टी बी पी चावला छावणीत, तर तीस जणांची व्यवस्था मणेसर मध्ये करण्यात आली आहे. या सर्वांच्या चाचण्या सुरू आहेत.

४४५ विमानांमधून आलेल्या ५८ हजार ६५८ प्रवाशांची तपासणी, आतापर्यंत करण्यात आली असून १४२ संशयितांना इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. १३० नमुन्यांपैकी १२८ नमुन्यांमध्ये विषाणू आढळलेला नसून, विषाणू आढळलेल्या केरळमधल्या  दोन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.