नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२० च्या संचालक स्मिता वत्स यांच्यासह अनेक मान्यवर समारोप सोहळ्याला उपस्थित होते. समारोप सोहळ्यासोबतच पुरस्कारांचंही वितरण आज झालं.

ब्राझीलच्या बार्बरा पाझ यांच्या बाबेंको टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटानं मिफ २०२० चा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा मानाच्या सुवर्ण शंखावर आपलं नाव कोरलं. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघुपटानं  सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार पटकावला, तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटाचा पुरस्कार जर्मनीच्या इजाबेला प्लुसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या या चित्रपटांना विभागून देण्यात आला.

पदार्पणातल्या चित्रपटासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार उमाशंकर नायर, गाइती सिद्दीकी यांच्या “ग्रॅन्डफादर” या नेपाळी लघुपटाला मिळाला. विदयार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आयडीपीए पुरस्कार  अनंत दास साहनी यांच्या “नेकेड वॉल” या लघुपटाला मिळाला. तर जलसंवर्धन आणि हवामान बदल या विषयावर यावर्षीपासून सुरु केलेला विशेष पुरस्कार वेटलँड्स वेल या अरविंद एम. यांच्या लघुपटानं पटकावला.

राष्ट्रीय विभागात अॅनिमेशनपटासाठीच्या रौप्यशंख ज्योत्स्ना पुथरन यांच्या मिक्सीला, ४५ मिनीटांपर्यंतच्या कालावधीच्या लघुपटाचा रौप्यशंख शाझिया इक्बाल यांच्या बेबाक – डाईंग विंड एन हर एअर या लघुपटाला, एका तास कालावधीपर्यंतच्या माहितीपटाचा पुरस्कार पुतुल महमुद यांच्या अतासी या माहितीपटाला मिळाला, एका तासपेक्षा अधिक कालावधीपर्यंतच्या माहितीपटाचा पुरस्कार सपना भवानी यांच्या सिंधुस्थान या माहितीपटाला मिळाला.

तर दिग्दर्शक जयशंकर यांच्या लच्छावा या लघुपटाला राष्ट्रीय गटात  सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष उल्लेखनीय लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.