संकल्पना, सूचना देण्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागातील सहल आयोजक (टूर ऑपरेटर), ट्रेकर्स (गिर्यारोहक) आणि पर्यटनविषयक लेखक (ब्लॉगर्स) यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या सर्व घटकांनी राज्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, सूचना द्याव्यात, असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, अभिनेते मिलींद गुणाजी, पर्यटन सहसचिव धनंजय सावळकर यांच्यासह विविध सहल कंपन्यांचे प्रतिनिधी, नामवंत ट्रेकर्स, सोशल मीडियावर ट्रॅव्हल आणि टुरीजमसंदर्भात लिहिणारे नामवंत ब्लॉगर्स, लेखक उपस्थित होते.
सहल आयोजकांशी चर्चा करताना मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, देश आणि जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी पर्यटन विभाग नियोजन करत आहे. यामध्ये टुर ऑपरेटर्सचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. टुर ऑपरेटर्सनी यासाठी योगदान द्यावे, त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनामार्फत दिले जाईल. सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात यावेळी गिर्यारोहकांसमवेत चर्चा झाली. गडकिल्ल्यांवर दारुबंदी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी उपस्थित सर्व गिर्यारोहकांनी शासनाचे तसेच मंत्री श्री. ठाकरे यांचे आभार मानले. या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे तसेच या परिसरातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय आहे, अशा भावना यावेळी गिर्यारोहकांनी व्यक्त केल्या. गिर्यारोहणासह विविध साहसी पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
मंत्री श्री. ठाकरे यांनी फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्युब, टीकटॉक आदी सोशल माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या सोशल माध्यम लेखक, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आदींशी चर्चा केली. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध संकल्पना सुचवाव्यात, त्यातील कल्पक सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.