नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२३ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाबाधित २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत.

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं कोरोनाची लागण झालेल्या एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. मृताच्या कुटुंबियांना विलगिकरणात ठेवलं आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज २४ नं वाढ होऊन ती  ६४  झाली आहे. यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या चार महापालिका क्षेत्रांमधल्या २४ रूग्णांचा समावेश असून त्यातले सर्वाधिक ११ रुग्ण हे नवी मुंबईतलें आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी – ६, मीरा भाईंदर ५ आणि ठाण्यातल्या २ रुग्णांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ४८ तासांनंतर दोन रुग्ण मिळाले  असून त्यामध्ये ठाणे महापालिकाकार्यक्षेत्रात एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित दोन रुग्ण आढळले आहेत. यातला एक रुग्ण उमरगा तालुक्यातला असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातल्या धानूरी इथला आहे. तो मुंबईत हॉटेलमध्ये काम करत होता. काही दिवसापूर्वी तो गावी आला होता. त्याला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी ठेवलं जाणार आहे, तर त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे यांनी सागितलं.

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळला नसून दिल्लीच्या निझामोद्दीन इथं झालेल्या मरकज मधून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. आणखी तीन व्यक्ती दिल्लीवरून आल्या असून त्यांनाही विलगीकरणात ठेवलं आहे. त्यांचा मरकजशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सिंधुदुर्ग जिल्हयात आढळलेला कणकवली तालुक्यातला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे. २४ तासातले त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. मात्र या रुग्णाला पुढचे काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा कोरोनामुक्त झाला म्हणून बेफिकीर होऊन चालणार नाही. लोकांनी काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे.

दिल्लीतल्या धार्मीक कार्यक्रमाला धुळ्यातनं तब्बल १६ जण गेले होते. याशिवाय तबलिगी जमातचे ५८ जण धुळ्यात आले होते, त्यांचा शोध घेऊन प्रशासनानं तपासणी आणि उपचार सुरु केले आहेत. यामध्ये नेपाळ तसंच मुंबई, भुवनेश्वर इथून आलेल्या प्रत्येकी ११ जणांचा समावेश आहे. अशा ७४ जणांची तपासणी केली जात आहे.