मुंबई :  गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या विभागाने सुधारित निधीची तरतूद करुन याबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या.

विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला वित्त विभागाचे (वित्तीय सुधारणा) प्रधान सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.पटोले म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करुन या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीबाबतचा आराखडा तयार करावा तसेच यासाठी सुधारीत प्रशासकीय आदेश काढावेत. या महाविद्यालयाच्या कामाला गती देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महाविद्यालयाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या महाविद्यालयाच्या कामासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देताना महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. या महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, अशा सूचनाही श्री. पटोले यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या.