मुंबई : राज्यातील सर्व हज यात्रेकरूंना एकसमान हज प्रशिक्षण मिळण्याकरिता नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी घेतला आहे.

जिल्हा हज समिती गठित करणे, नागपूर हज हाऊस इमारतीचे “हजरत बाबा ताजुद्दीन र.अ.हज हाऊस, नागपूर ”असे नामकरण करणे, अत्याधुनिक विज्ञानाचा वापर करून हज यात्रेस जाणाऱ्या इच्छुक यात्रेकरूंसाठी घरबसल्या प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे,  हज यात्रेसंदर्भात नवीन अँँप (app) तयार करून मोबाईलवर प्रशिक्षण पाहण्यासाठी व्यवस्था तयार करण्याकरिता समिती स्थापन करणे,  महाराष्ट्र राज्य हज समितीचे बोधचिन्ह तयार करणे, हज यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी हाजीदोस्त नेमणे,  मुंबई , नागपूर व औरंगाबाद येथील विमानोड्डाण स्थळ (गंतव्य स्थान ) येथील सहाय्यकारी सुविधांचे काम मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील जिल्हा हज समितीस देणे, महाराष्ट्र राज्य हज समितीमध्ये विधी सल्लागार नियुक्त करणे असे काही महत्त्वपूर्ण निर्णय श्री. सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आले.

हज कमेटी ऑफ इंडियाचे कामकाज व्याजाच्या उत्पन्नातून चालते. त्यातून मुक्तता करून इस्लामच्या नियमानुसार कामकाज चालविण्यात यावे, अशी शिफारस केंद्रीय हज समितीस करण्याचा निर्णयही झालेल्या बैठकीत घेण्यात आला.