पुणे : शहरात दुचाकी चालक ट्रिपल सीट, भरधाव वेगात बेभान गाडी चालवणे आणि ड्रिंक करून गाडी चालवणे असे प्रकार घडतात. अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र सध्या शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकी स्वारांवर पोलीस कारवाई करत आहेत. अशांवर कारवाईपेक्षा त्यांचे प्रबोधन केले गेले पाहिजे, तर हायवेवर हेल्मेट सक्ती केली पाहिजे, असे मत पुण्याचे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पुणे शहरातल्या प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बापट यांनी ही भूमिका मांडली.
१ जानेवारी पासून पुण्यात विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना दंड आकारला जातो आहे. या कारवाईला शहरातल्या अनेक संघटनांनी विरोधही दर्शवला होता. हेल्मेटसक्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढला गेला होता. या प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीत वातावरणही तापले होते. आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गिरीश बापट यांनी मात्र शहरापेक्षा हायवेवर हेल्मेटसक्तीची गरज आहे अशी भूमिका मांडली आहे.
तसंच शहरात जे ट्रिपल सीट, भरधाव वेगात बेभान गाडी चालवणे आणि ड्रिंक करून दुचाकी चालवतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. हायवेवर हेल्मेट सक्ती असावी ही आपली भूमिका आहे याबाबत आपण लवकरच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही बापट यांनी स्पष्ट केलं.