मुंबई – शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत अन्न, नागरीपुरवठा विभागाने फर्मान काढले आहे. या निर्णयामुळे लाभार्थींच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विकल्या जाणाच्या प्रकारांना चाप बसणार आहे.
अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या शिधावाटपात अनेक वेळा महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच दुकानदार अन्नधान्याचे वाटप करतो. त्यानंतर धान्य शिल्लक नाही, धान्याचा वाढीव साठा आलेला नाही.
पुढील महिन्यात घ्या, अशी थातुरमातुर कारणे दुकानदारांकडून सांगण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. लाभार्थींची इच्छा असूनही त्यांना महिन्याच्या एका ठराविक वेळेतच धान्याची खरेदी करावी लागत होती. त्यानंतर धान्याचे वाटप दुकानदाराकडून थांबवले जात असे. त्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत होते. हा शिल्लक साठा काळ्या बाजारात विकला जात असे.
मात्र यापुढे महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजे महिनाभर दुकानदाराला शिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थींसाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना राज्यातील सर्व दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
51 हजार 363 – शिधावाटप दुकानांची संख्या
1 कोटी 48 लाख – शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या