नवी दिल्ली : शहरातील कोविड -19 च्या परिस्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कोविड -19 वॉर रूमची स्थापना करण्यात अली आहे. स्मार्ट शहर अभियानांतर्गत, कार्यवाहीयोग्य दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्वरित निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी माहिती मिळविणे, तिचे संकलन करणे आणि संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे उपाय या वॉर रूममध्ये अवलंबिले गेले आहेत. वॉर रूममध्ये पुढील डॅशबोर्ड कार्यरत आहेत:

हेल्थ केअर आणि पेशंट ट्रॅकिंग डॅशबोर्डः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक डॅशबोर्ड विकसित केला आहे जो कोविड संबंधित प्रकरणांची चाचणी आणि आरोग्यविषयक व्यवस्थेविषयी वास्तविक माहिती प्रदान करतो. प्रत्येक रुग्णालयाला डॅशबोर्डवर समर्पित ऑनलाइन अर्जाद्वारे प्रवेश देण्यात आला आहे ज्यामध्ये प्रत्येक रुग्णालयाच्या युनिटद्वारे माहिती भरली जाते जी आयसीसीसीमधील (एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्षातील) डॅशबोर्डवर रिअल-टाइम (वास्तविक वेळेच्या) आधारावर अद्ययावत होते. या डॅशबोर्डमध्ये खाटांची क्षमता, नमुना चाचणी, कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांची माहिती यासारख्या मापदंडांवर नियमितपणे अद्यतने प्रदान करण्यासाठी कोविड उपचार प्रदान करणार्‍या 10 रुग्णालयांमधील माहिती आढळते.

 

कोविड -19 भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) डॅशबोर्डः ही स्थान-आधारित माहिती प्रणाली आहे. घरात विलगीकरण केलेल्या रुग्णांच्या (नकाशावर जांभळ्या रंगाचे ठिपके आहेत), कोविड -19 बाधित व्यक्तींचे शेवटचे स्थान (लाल रंगाचे ठिपके), प्रतिबंधित क्षेत्र (काळ्या रेषा), गल्ली बंद करणे इत्यादी गोष्टींच्या जीओटॅगसाठी वापरली जाते. एकदा रुग्ण कोविड-19 आजाराने बाधित असल्याचे आढळल्यानंतर त्याच्या / तिच्या राहण्याचे शेवटचे ठिकाण डॅशबोर्डवर चिन्हांकित केले जाते. त्याचप्रमाणे, घरातच विलगीकरण केलेल्या व्यक्ती नकाशावर चिन्हांकित आहेत. ही माहिती कमी जोखीम ते उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींचा वर्गीकरणात्मक नकाशा तयार करण्यात मदत करते. या डॅशबोर्डचा वापर कोविड-19 ची मुख्य केंद्र ओळखण्यासाठी देखील केला जातो ज्यामुळे आरोग्य विभागाला जंतुनाशकांच्या त्वरित फवारणीसाठी स्थाने ओळखण्यास मदत होते. हीच माहिती वैद्यकीय विभागामार्फत घराघरात रुग्णशोध घ्यायला विशेष कृती दल पाठवण्यासाठी आणि अशी आणखी काही प्रकरणे आढळल्यास ओळखण्यासाठी वापरली जाते. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र ओळखण्याकरिता ही भौगोलिक माहिती मदत करते. जीआयएस डॅशबोर्ड आणि शहरावर पाळत ठेवण्याच्या डॅशबोर्डचा वापर देशभरात सर्वत्र होऊ शकतो.

शहरावर पाळत ठेवण्याचे डॅशबोर्डः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उपक्रमांवर नजर ठेवण्यासाठी 85 ठिकाणी एकूण 298 ‘पॉइंट-टिल्ट-झूम’ पाळत ठेवणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेचे डॅशबोर्ड आयसीसीसी येथे स्थापित केले गेले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्तपणे त्याचे परीक्षण केले आहे. जर पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्याने एखाद्या ठिकाणी 3 पेक्षा जास्त लोक दिसले तर त्याबाबत सतर्कतेचा सूचना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व्हिडीओ विश्लेषणदेखील सुरू करीत आहे. अशाचप्रकारच्या अन्य उपाययोजनांचा शोध लावला जात असून लवकरच त्या लागू केल्या जातील.

सारथी हेल्पलाईन डॅशबोर्डः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे एक समर्पित हेल्पलाइन प्लॅटफॉर्म आहे, सारथी (हेल्पलाइन माहितीच्या सहाय्याने रहिवासी आणि बाहेरच्यांना मदत करणारी यंत्रणा), ज्यामध्ये नागरिक सेवा वितरणासंदर्भात कोणत्याही मदतीसाठी विनंती करु शकतात. हेल्पलाइनद्वारे प्राप्त केलेले सर्व कॉल ऑडिओ फाईल म्हणून जतन केले गेले आहेत आणि विनंतीच्या प्रकारानुसार तारीखवार माहिती, जबाबदार विभाग आणि  विनंती संपण्याच्या स्थितीच्या संदर्भात देखील माहितीचे जतन केलेले आहे. सारथीचा डॅशबोर्ड आयसीसीसी येथे स्थापित केला गेला आहे जो यावर विश्लेषणे प्रदान करतोः जसे कि नागरिकांकडून मोट्या प्रमाणावर विनंती / तक्रारी, विनंती / तक्रार निवारण स्थिती, विभागनिहाय विनंती / तक्रारी इत्यादी.

केवळ 2 आठवड्यांच्या कालावधीत – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी अॅपवर 30,000 हून अधिक डाउनलोड आहेत; ट्विटर फॉलोअर्स तिप्पट झाले आहेत आणि फेसबुक फॉलोअर्स जवळपास दुप्पट झाले आहेत. कोविड -19 आजाराने बाधित सर्व रूग्ण आणि विलगीकरण केलेल्या  व्यक्तींचा वॉर रूममधून मागोवा घेतला जातो.