मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा तडाखा बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता शासनाला हातभार लावण्यासाठी वाळूज, औरंगाबाद येथील बजाज ऑटो लि.कामगार संघटना आणि भारतीय कामगार सेनेच्या कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख 54 हजार रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री निवासस्थानी देण्यात आला.

बजाज ऑटो लि. कामगार संघटना वाळूजचे अध्यक्ष बाजीराव ठेंगडे, सचिव संपतराव गायकवाड, मनोहर लघाने, अशोक कटारे, गोरख वेळंजकर तसेच भारतीय कामगार सेना बजाज ऑटोचे युनिट अध्यक्ष विलास जाधव, सचिव अशोक डवरे, विभागीय चिटणीस प्रभाकर मते आदी यावेळी उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता शासनास हातभार लावण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प बजाज ऑटो, वाळूजच्या कामगार संघटनांनी घेतला होता. त्यानुसार संघटनेच्या सभासदांनी आपल्या पगारातून प्रत्येकी २०० रुपयांचे योगदान दिले आहे. संघटनेने यापूर्वी शहीदांचे कुटुंबीय, भूकंपग्रस्त आदींच्या मदतीसाठीही मुख्यमंत्री सहायता निधीत मदत दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.