नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-गव्हर्नन्सचा लाभ तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी या व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात असे उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटले आहे.

नायडू यांनी काल मध्यप्रदेशात जबलपूर इथे पंडित द्वारका प्रसाद मिश्रा भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यासाठी भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपातला आशय निर्माण करण्याची गरजही नायडू यांनी अधोरेखित केली.

आपण सगळ्यांनीच या कामाकडे डिजिटल सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून पाहायला हवे आणि त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही नायडू यांनी केले.