नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत नवनवे विक्रम रचले आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
आजच्या महिला दिनाच्या निमीत्तानं आपण सगळ्यांनी स्त्री – पुरुष असमानतेचं पूर्णतः उच्चाटन करायचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशातून केलं आहे.
महिलांच्या प्रगतीशिवाय देश प्रगती करू शकत नाही असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस महिलांमधला उत्साह, त्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या वाटचालीत महिला वर्ग महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमीत्तानं त्यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कोरोना संकट काळातलं स्त्रीशक्तीचं धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच. पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊया. त्यासाठी वचनबद्ध होऊया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे.
महाराष्ट्रातली स्त्रीशक्ती हा वारसा अधिक समर्थपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. गाव-खेड्यात राहणाऱ्या, शेतामध्ये कष्ट करणाऱ्या, शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता-भगिनींच्या त्यागाचं स्मरण करून, राष्ट्रनिर्मितीतल्या स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राज्यातल्या स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.