मुंबई: प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित झालेल्या आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार जागतिक महिला दिनी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.
यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र एनसीसीचे संचालक लेफ्टनंट जनरल वाय.पी खंडूरी, आयएमएनयुसीओ कॅप्टन अजित नायर तसेच एनसीसीचे अधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महिला, विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.
ॲड. ठाकूर या यावेळी म्हणाल्या, यावेळी गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांनी लहान वयात केलेली कामगिरी उल्लेखनीय असून यापुढे असेच यश मिळवावे यासाठी शासन आपल्या पाठीशी असून शासनातर्फे आवश्यक ती मदत देण्यात येईल.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हे आपल्याला जीवनात सफल बनविण्याचा मार्ग असून यशाची शिडी चढण्याचे साधन आहे. जीवनात यशस्वी बनण्यासाठी स्वत:वर केंद्रित व्हावे. कुठलीही गोष्ट अशक्य नसून प्रयत्न करणे गरजेचे आहे. एनसीसीच्या माध्यमातून जबाबदार व्यक्तिमत्व तयार होते. आज मी ज्या पदावर आहे हे एनसीसीमुळे आहे. एनसीसीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.