मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १२४ व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२० आहे.

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने २०१९ -२० या चालू वर्षातील,दिनांक दिनांक ०१जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन,सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १२४ व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा ,मुंबई उपनगर येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा रुपये ४५०/- तर दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना दरमहा रुपये १००/- एवढे प्रशिक्षण शुल्क आहे. प्रशिक्षणासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत,

प्रशिक्षणार्थी पात्रता निकष: १) प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार असावा व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. २) वयोमर्यादा १८ ते ३५ यादरम्यान असावी. ३) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. ४) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक आहे. ५) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. ६) प्रशिक्षणार्थी हा बायोमेट्रिक कार्ड/आधार कार्डधारक असावा. ७) विहित नमुन्यात परिपूर्ण अर्जासोबत संबंधित मत्स्यव्यवसाय संस्थेची शिफारस असावी. ८) प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास संबंधित सक्षम अधिकारी/ गट विकास अधिकारी यांचा दाखला अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रशिक्षणार्थीनी विहित नमुना अर्ज वर नमूद कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली,वर्सोवा मुंबई ६१ या पत्त्यावर २० जून २०२० पर्यत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.