साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे महान साहित्यिक, थोर विचारवंत, समाजवादी नेते आदरणीय पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

साने गुरुजी त्यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या रुपानं कायम आपल्यासोबत आहेत. या पुस्तकानं कितीतरी पिढ्यांची सोबत केली. त्यांना घडवलं, सुसंस्कारित केलं. अनेकांना त्यांची ‘आई’ याच पुस्तकात गवसली. साने गुरुजी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेलं, अस्पृश्यता, जातीभेद, अनिष्ट रुढी, वाईट परंपरा संपवण्यासाठी जीवनभर संघर्ष केलेलं, स्वातंत्र्यानंतर देश एकसंध ठेवण्यासाठी आंतरभारती चळवळ उभारणारं दूरदृष्टीचं नेतृत्व. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सेवावृत्ती रुजवून देशाच्या भावी पिढ्या सुसंस्कृत, सक्षम करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचे विचार सदैव प्रेरणा देत राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.