पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात असून पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावण्यावर भर देण्यात येईल. तसेच, शहरातील विविध प्रश्‍नांवर योग्य निर्णय घेवून सोडविणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तारुढ पक्षनेतेपदी नगरसेवक नामदेव ढाके यांची आज सोमवारी निवड झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ढाके बोलत होते. तत्पूर्वी, महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात सर्व नगसेवकांनी पक्षनेतेपदी नामदेव ढाके यांच्या नावाचा ठराव पारित करून त्यांची निवड निश्‍चित करण्यात आली. यावेळी, सभागृहात उपस्थित भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी ढाके यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी भाजपचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी नामदेव ढाके यांच्या नावाची शिफारस केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ढाके यांना पदावर बसविण्यास कोणतीही हरकत नसल्याची सूचना शहर भाजपला कळविली. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शिफारश पत्र शहराध्यक्ष आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले. आज सोमवार दि. 17 रोजी महापालिकेत सर्व सदस्यांची बैठक घेऊन पक्षनेते पदी नामदेव ढाके यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. सर्वांनी नामदेव ढाके यांच्या नावाच्या ठरावावर स्वाक्षरी केली.