मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरचा चर्चगेट ते हुतात्मा चौक हा ६४८ मिटर लांब भुयारीकरणाचा ३४ वा टप्पा आज पूर्ण झाला. पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश असून हुतात्मा चौक स्थानकाचं एकूण ५३ टक्के काम पूर्ण झालं आहे. पॅकेज-१ मध्ये एकूण ८१ टक्के भुयारीकरण आणि ७० टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे.

हुतात्मा चौक स्थानकामुळे चर्चगेट रेल्वे स्थानक, काही देशांचे दूतावास, मुंबई उच्च न्यायालय, विविध बँकांची आणि वित्तीय संस्थांची मुख्यालयं, स्टॉक एक्सचेंज, बलार्ड इस्टेट, विविध रुग्णालयं, महाविद्यालयं, वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, जहांगीर आर्ट गॅलरी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एशियाटिक लायब्ररी आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोचणे सुलभ होणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितलं.