पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जप्तीची कारवाई करु नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करसंकलन विभागाकडून थकीत मिळकतकर व शास्तीकर भरण्याबाबत नागरिकांना नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसाच्या आत मिळकत न भरल्यास मध्यवर्ती अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाचे पथकामार्फत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वस्तुत: काही दिवसापूर्वी 500 स्क्वेअर फूटापर्यंत मिळकतकर माफ करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अद्याप निर्णय प्रलंबित आहे. या शिवाय महापालिका सर्वसाधारण सभेत शास्तीकर 100 टक्के कर माफ करावा असा ठराव करण्यात आला आहे.
या ठरावावर शासनाचा निर्णय प्रलंबित आहे. मात्र मनपा प्रशासन घाई करुन मालमत्ता जप्तीचा हेका धरीत आहे. हे दडपशाही आणि हुकूमशाही पध्दतीचे काम बंद करावे. त्याचबरोबर कोणत्याही नागरिकाने मूळ कर आकारणी प्रमाणे कर भरुन शास्तीकर भरण्यास नकार द्यावा. शासनाने निर्णय देईपर्यंत कोणीही शास्तीकर भरु नये असे आवाहन साने यांनी केले आहे.