विधीमंडळ पावसाळी अधिवेशन पुर्वसंध्येला पत्रकार परिषद
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पदुम मंत्री महादेव जानकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत. राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने अधिवेशनात दुष्काळावर चर्चा करण्यात येईल. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 4 हजार 700 कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच 3 हजार 200 कोटी रुपयांचा पिकविमा वितरित करणे सुरू आहे. प्रधानमंत्री किसान योजनेत राज्यातील 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल. त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यांच्या खात्यातही खरिपापूर्वी रक्कम जमा होणार आहे.
दुष्काळी भागात आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या. जनावरांसाठी पालनपोषणाच्या दरात भरीव वाढ करण्यात आली. पहिल्यादाच राज्यात दोन ठिकाणी छोट्या जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. जनावरांचे टॅगिंग केल्याने चारा छावणीच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार रोखण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेली 5 वर्ष सर्व समाजाला समोर ठेवून निर्णय घेतले. आव्हानांना सकारात्मकतेने पुढे गेल्यामुळे जनतेने विश्वास दाखविला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलल्याने वैद्यकिय प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यश आले आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल. मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांसह यापुढेही अधिक जबाबदारीने चांगले काम करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.