नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार ६९३ जणांना या विषाणूची बाधा झाली असल्याचं हुबेई प्रांताच्या आरोग्य आयोगानं सांगितलं. यामुळे चीनमधल्या कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या आता ७४ हजाराच्या वर गेली आहे. मात्र यापैकी बहुतांश रुग्णांचा आजार किरकोळ असल्याचा दावा चीनी अधिका-यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात केला आहे.

हुबेई प्रांताबाहेर या विषाणुच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु केल्यापासून नव्यानं नोंद होणा-या रुग्णांची संख्या घटत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असल्याचं हे लक्षण आहे, असं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं म्हटलं आहे.

चीननं उचलेल्या पावलांनंतर याबाबत लक्षणीय प्रगती झाली असल्याचं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काल ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना दूरध्वनीवरुन सांगितलं. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता घटत जाईल, असं एवढयात सांगणं घाईचं ठरेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.