नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना होणा-या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी, असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे.

या कृतीदलातल्या तुर्कस्तान वगळता इतर सर्व सदस्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद केली आहे. पाकिस्तानची सदैव पाठराखण करणा-या चीन आणि सौदी अरेबियानंही यावेळी भारत, अमेरिका आणि युरोपीय देशांशी हातमिळवणी केली आहे.

दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयश आल्याबद्दल पाकिस्तानला करड्या यादीतच कायम ठेवावं, अशी शिफारस कृती दलाच्या उपगटानं केली आहे.