नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन सरकारनं, जागतिक आरोग्य संघटनेच्या १२ तज्ञांच्या पथकाला, कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरात जाण्याची परवानगी दिली आहे.
हे पथक आज वुहानला पोचेल.गेल्या सोमवारी हे पथक चीनमध्ये दाखल झालं होतं. मात्र त्यांना वुहानला जाण्याची परवानगी दिली नव्हती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची कारणं आणि संसर्गावर प्रभावी औषधाचा शोध लावण्याची जबाबदारी या पथकावर असेल.
चीनचे काही आरोग्य तज्ञही या पथकासोबत असणार आहेत.या पथकानं हुबेतल्या अधिकाऱ्यांसोबत टेली कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसंच ग्रामीण भाग आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, तसंच कोरोना विषाणूवर औषध विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती घेतली.
दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आत्तापर्यंत चीनमध्ये २ हजार २३६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ७५ हजार ५६७ जणांना कोविड १९ या आजाराची लागण झाल्याची माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.