नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथं डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटननं सुरु केली आहे.

आज एका विशेष विमानानं ब्रिटीन आणि युरोपातले ३२ जण जपानमधून रवाना झाले आहेत अशी माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. हे विमान इंग्लडच्या बॉस्कॉम्ब डाऊन लष्करी तळावर उतरल्यानंतर, विमानातल्या सर्व प्रवाशांना १४ दिवसांसाठी विशेष वैद्यकीय कार्यक्रमाअंतर्गत निरीक्षणाखाली ठेवलं जाईल अशी माहितीही ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

डायमंड प्रिन्सेस या जहाजावर वास्तव्य करून, हाँगकाँगमध्ये उतरलेल्या एका व्यक्तीला कोविड-१९ हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून या जहाजवरचे सर्व प्रवासी जहाजावरच निरीक्षणाखाली ठेवले होतं.

या प्रवाशांना कोविड-१९ ची लागण झालेली नाही, असं स्पष्ट झाल्यानंतरच, या आठवड्यापासून त्यांना जहाजातून बाहेर जाऊ दिलं जात आहे.