मुंबई : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
नागपूर येथील भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना श्री.शिंदे बोलत होते.
श्री. शिंदे म्हणाले, हंजर कंपनीच्या व्यवहाराबाबत विधी व न्याय, सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू आहे. तसेच या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे २ हजार ११५ कोटी इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासंदर्भात करारनामा करण्यात आला असून, लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संबंधित कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप असून, विभागीय आयुक्तांच्या स्तरावर चौकशी समिती नेमून, चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री श्री.शिंदे यांनी दिली.